अपक्ष आमदार शरद सोनवणे यांचा उद्या शिवसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेळावा
नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे आयोजित होणाऱ्या शिवसेना मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील प्रमुख नेत्यांचा समावेश होणार आहे. या मेळाव्यात अपक्ष आमदार शरद सोनवणे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे. मेळावा २८ फेब्रुवारी (शुक्रवार) सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून हकालपट्टी झालेले माजी आमदार बाळासाहेब दांगट, शिवसेना उबाठा पक्षाचे तालुका संघटक व नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील ४०० पेक्षा अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा समावेश आहे.
एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन आणि उपस्थिती या मेळाव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. शिंदे, नारायणगाव येथील मेळाव्यात सहभागी होऊन त्यानंतर गोद्रे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या कामाची पाहणी करणार आहेत. शिंदे त्यानंतर चाळकवाडी येथील आमदार सोनवणे यांच्या राजगड कार्यालयाला भेट देऊन शिवसेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
हे देखील वाचा: शेवग्याच्या शेंगांसाठी वाद विकोपाला, सख्ख्या भावाचा खून
आमदार शरद सोनवणे यांची प्रतिक्रिया:
आमदार शरद सोनवणे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, राज्यात युती असली तरी पुणे जिल्ह्यात स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरुद्ध जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी नारायणगाव येथे शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
श्री विघ्नहर कारखान्याची निवडणूक अगदी जवळ आली आहे, तसेच माघारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सत्यशील शेरकर यांनी पॅनल जाहीर केले असले तरी शेतकरी संघटनेसह चर्चा करून काही जागा देऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सोनवणे यांनी स्पष्ट केले.












