आयपीएलच्या थराराला २२ मार्चपासून होणार सुरुवात; कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना
मुंबई: क्रिडाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १८ व्या मोसमाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या सर्व सामन्यांचे ठिकाण, संघ आणि तारखा जाहीर केल्या आहेत.
२२ मार्चपासून आयपीएलच्या थराराला सुरुवात होणार असून गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुपारी ३:३० वाजता खेळला जाईल. त्याच दिवशी संध्याकाळी ७:३० वाजता चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एक ब्लॉकबस्टर सामना होईल.
आयपीएलमध्ये चेन्नई, मुंबई आणि बंगळुरू या संघांचा चाहतावर्ग सर्वात जास्त आहे. या तिन्ही संघांच्या सामन्यांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. हे लक्षात घेऊन बीसीसीआयने आरसीबी आणि एमआय विरुद्ध सीएसकेसाठी प्रत्येकी दोन सामने नियोजित केले आहेत. चेन्नई संघ २३ मार्च रोजी चेपॉक येथे पहिल्यांदाच मुंबईचा सामना करेल.
हे देखील वाचा: रविवारी बारामतीत मुष्टियोध्दा विजेंदरसिंह! शरयू फाउंडेशनच्या बारामती हाफ मॅरेथॉनमध्ये धावणार 5000 धावपटू!
२० एप्रिल रोजी दोन्ही संघ वानखेडेवर एकमेकांसमोर येतील. सीएसकेचा आरसीबी विरुद्धचा पहिला सामना २८ मार्च रोजी चेपॉक येथे खेळला जाईल, तर दोन्ही संघांमधील दुसरा सामना ३ मे रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल.
आयपीएल २०२५ मध्ये ७० ग्रुप स्टेज सामने होतील. यानंतर, लीगमधील अव्वल ४ संघ प्लेऑफसाठी स्पर्धा करतील. यावेळी प्लेऑफमधील पहिला सामना म्हणजेच क्वालिफायर-१ २० मे रोजी खेळला जाईल. एलिमिनेटर सामना २१ मे रोजी होईल, तर क्वालिफायर-२ चा सामना २३ मे रोजी होईल. त्यानंतर २५ मे रोजी फायनलच्या सामन्यासाठी दोन संघ अंतिम फेरीत जेतेपदासाठी लढतील.












