शिवाजीनगर आणि स्वारगेट बस डेपो, मेट्रो स्थानकाचा विकास: १ मे २०२५ रोजी भूमीपूजनाची तयारी
पुणे: शिवाजीनगर आणि स्वारगेट येथील एसटी बसस्थानकाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, १ मे २०२५ रोजी या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते सांमजस्य करार तातडीने पूर्ण करावेत, असेही त्यांनी सांगितले. ही माहिती राज्याच्या परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
शिवाजीनगर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा निर्णय पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी महामेट्रो आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करावे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
बुधवारी झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
बुधवारी (दि. १२) मुंबई येथे झालेल्या आढावा बैठकीत या प्रकल्पाची चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर तसेच राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर उपस्थित होते.
हे देखील वाचा: खेड बाजार समितीचे संचालक सयाजी मोहिते यांचा हमाल परवाना रद्द
माधुरी मिसाळ यांनी नुकताच परिवहन राज्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर शिवाजीनगर आणि स्वारगेट बसस्थानकाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी सांगितले, “शिवाजीनगर बसस्थानकाच्या धर्तीवर स्वारगेट येथील बसस्थानक आणि मेट्रो स्थानक विकसित करण्याबाबत सूचना केल्या आहेत. येत्या आठ दिवसात प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.”
शिवाजीनगर बसस्थानकाचा इतिहास
शिवाजीनगर बसस्थानक २०१९ मध्ये वाकडेवाडी येथे स्थलांतरित झाले. मात्र, मागील पाच वर्षांत जुन्या स्थानकाच्या विकासावर केवळ चर्चाच सुरू आहे. प्रत्येक वेळी बसस्थानकाच्या विकासाचे भिजत घोंगडे बाहेर काढायचे, बैठका आणि चर्चा करायची, प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना द्यायच्या. मात्र, अंमलबजावणीच्या अभावी ही दोन्ही बसस्थानके विकासापासून वंचित राहिली आहेत.
स्वारगेट बसस्थानकाचा विकास
स्वारगेट येथील बसस्थानक आणि मेट्रो स्थानकाच्या विकासासाठीही योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत मोठा बदल घडवून आणता येईल.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा आग्रह
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर बसस्थानकाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन वेळोवेळी पाठपुरवठा केला आहे. त्यांनी सांगितले, “शिवाजीनगर येथे अत्याधुनिक एसटी बसस्थानकाचे भूमिपूजन मे २०२५ मध्ये होईल. त्याआधी मेट्रोच्या वरील बाजूस हे बसस्थानक उभारण्यासाठी एसटी महामंडळ आणि महामेट्रो यांच्यात येत्या आठवड्यात एमओयु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
या प्रकल्पांमुळे पुणे शहराच्या वाहतुकीत सुधारणा होऊन नागरिकांना सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळेल, अशी अपेक्षा आहे.












