राजगडमधील शेकडो रेशनधारकांची नावे चक्क उत्तर प्रदेशात
वेल्हे: राज्यातील अतिमागास व दुर्गम राजगड (वेल्हे) तालुक्यातील शेकडो रेशनिंग कार्डधारकांची नावे चक्क उत्तर प्रदेशातील रेशनिंग दुकानात समाविष्ट झाल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे हा गोंधळ झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संबंधित कष्टकरी कार्डधारकांचे रेशनिंग बंद झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तर दुसरीकडे अन्नधान्य पुरवठा विभाग मात्र सुस्तावलेला दिसून येत आहे. या गंभीर प्रकाराकडे अद्यापि पुरवठा विभागाचे लक्ष नाही.
ऑनलाइन रेशनिंग वितरण सुरू झाल्याने राजगड तालुक्यासह राज्यातील अनेक कार्डधारकांची नावे उत्तर प्रदेशातील दुकानात गेली आहेत. वरिष्ठ पातळीवर राज्य शासनाने याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमोल नलावडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे.
वेल्हे येथील अन्नधान्य पुरवठा विभागात तसेच गावोगावच्या रेशनिंग दुकानदारांकडे वारंवार हेलपाटे मारूनही या कार्डधारकांना रेशन दिले जात नाही. पानशेतजवळील निगडे मोसे (ता. राजगड) येथील कार्डधारक चेतन दत्तात्रय नलावडे यांचे नाव रेशनिंग कार्डमधून अचानक कमी करण्यात आले आहे.
हे देखील वाचा: पवारसाहेब मला कधी गुगली टाकणार नाहीत; शिंदेंच्या बोलण्याचा अर्थ काय?
याबाबत त्यांनी आधारकार्डच्या आधारे ऑनलाइन माहिती घेतली असता उत्तर प्रदेशातील रेशनिंग दुकानात त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याचे समजले. राजगड तालुक्यातील 100 हून अधिक कार्डधारकांची नावे उत्तर प्रदेशातील रेशनिंग दुकानात समाविष्ट झाली आहेत. मात्र, त्यातील केवळ 25-30 जणांनी राजगड पुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे.
महाराष्ट्रात ऑनलाइन रेशनिंग वितरण होण्याआधी उत्तर प्रदेशात ऑनलाइन रेशनिंग वितरण सुरू झाले आहे. एका क्रमांकाचे आधारकार्ड असल्याने राजगड तालुक्यातील काही कार्डधारकांची नावे आधारकार्डमुळे उत्तर प्रदेशातील रेशनिंग दुकानात समाविष्ट झाली आहेत. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकार्यांना कार्डधारकांच्या तक्रारींचा प्रस्ताव देण्यात आला आहे; मात्र अद्यापही या कार्डधारकांची नावे उत्तर प्रदेशातच आहेत.
शीतल अनासाणे, नायब तहसीलदार, राजगड तालुका पुरवठा विभाग












