खासदार सुनेत्रा पवार यांची राज्यसभेत तालिका अध्यक्षपदी निवड
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या खासदार सुनेत्रा पवार यांची राज्यसभेत तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. आता त्यांच्या पहिल्याच टर्ममध्ये राज्यसभेत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, खासदार सुनेत्रा पवार यांची राज्यसभेत तालिका अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. तालिका अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट लिहून त्यांचे अभिनंदन केले आहे. तटकरे म्हणाले, “राज्यसभेतील चर्चेला योग्य दिशा देणे, संसदीय कामकाजाची शिस्त कायम राखणे आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडणे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या तालिका अध्यक्ष पदासाठी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा!”
राज्यसभेत तालिका अध्यक्ष म्हणून निवड
सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांची वर्णी राज्यसभेवर लागली होती. आता पहिल्याच टर्ममध्ये त्यांना राज्यसभेत तालिका अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे.










