छावा च्या ट्रेलरवर पुणेकरांची नाराजी; मराठा क्रांती मोर्चाची आक्रमक भूमिका, आंदोलनाचा इशारा!; छत्रपति संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित फिल्म ‘छावा’च्या ट्रेलरवर पुण्यात शिव प्रेमींनी व्यक्त केली नाराजी, मराठा क्रांति मोर्चाची विरोधाची तयारी
पुणे: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित बहुप्रतिक्षित ‘छावा’ या चित्रपटाचा ट्रेलर २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर यांनी केले असून, मुख्य भूमिकेत विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना दिसणार आहेत. मात्र, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांवर पुण्यातील शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने आज पुण्यात विरोध प्रदर्शन करण्याचा इशारा दिला आहे.
‘छावा’ चित्रपटावर वाद का?
या चित्रपटात विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका, तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरचे सर्वत्र कौतुक होत असले तरी, पुण्यात मराठा क्रांती मोर्चाने दावा केला आहे की या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह दृश्ये दाखवली गेली आहेत.
नेमका वाद काय आहे?
चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांच्या नृत्याचे दोन दृश्य दाखवण्यात आली आहेत.
मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या दृश्यांना आक्षेप घेत निर्मात्यांना ते काढून टाकण्याची मागणी केली आहे.
ही दृश्ये ऐतिहासिकदृष्ट्या चुकीची असल्याचा आरोप मोर्चाने केला आहे.
या संदर्भात आज सकाळी १० वाजता पुण्यातील लाल महाल येथे चित्रपटाच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
निर्मात्यांना विनंती, नाहीतर आंदोलन!
मराठा क्रांती मोर्चाने चित्रपटाच्या निर्मात्यांना त्वरित या आक्षेपार्ह दृश्यांमध्ये सुधारणा करण्याची विनंती केली आहे. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मोर्चाने दिला आहे.
चित्रपटाची प्रदर्शित तारीख
विक्की कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना स्टारर ‘छावा’ हा चित्रपट येत्या व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.












