पुणेकर सावध! गुइलेन-बैरे सिंड्रोमचा धोका, 67 रुग्णांची संख्या; पुणे शहरातील गुइलेन-बैरे सिंड्रोम (GBS) रुग्णांची संख्या वाढली, महानगरपालिका आयुक्तांचे निरीक्षण
पुणे: पुणे शहरात गुइलेन-बैरे सिंड्रोम (GBS) नावाचा एक दुर्मिळ आजार झपाट्याने फैलावत आहे. सध्या पुणे जिल्ह्यात एकूण ६७ रुग्ण आढळले आहेत. त्यातील नांदेड़, सिंहगड रोड परिसरातील किर्कटवाडी आणि धायरी भागांमध्ये या आजाराचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
महानगरपालिका आयुक्तांचा पाहणी दौरा
या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी बुधवारी नांदेड़ गावातील परिस्थितीची पाहणी केली. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या कुपनलिकेमध्ये शेवाळ वाढले असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे महानगरपालिकेला त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आयुक्तांनी नवीन समाविष्ट गावांतील विहिरी, पाण्याच्या टाक्या तसेच GBS बाधित भागांचा प्रत्यक्ष दौरा करून नागरिकांची विचारपूस केली. तसेच सर्व संबंधित महापालिका विभाग आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
गुइलेन-बैरे सिंड्रोमची लक्षणे कोणती?
या आजाराची प्राथमिक लक्षणे हात-पायात कमजोरी व झणझणीत भावना जाणवणे अशी असतात. आतापर्यंत पुण्यातील बाधित रुग्णांमध्ये हीच लक्षणे आढळून आली आहेत.
पुण्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय!
सुरुवातीला पुणे जिल्ह्यात ५९ रुग्ण आढळले होते, मात्र त्यात आणखी ७ जणांची भर पडून एकूण संख्या ६७ वर गेली आहे.
- पुणे ग्रामीण – ३९ रुग्ण
- पुणे शहर – १३ रुग्ण
- पिंपरी-चिंचवड – १२ रुग्ण
- इतर जिल्ह्यांतून आलेले – ३ रुग्ण
८०% रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत, तर उर्वरित २०% ससून हॉस्पिटलमध्ये सरकारी उपचार घेत आहेत.
डॉक्टरांचे मार्गदर्शन
- गुइलेन-बैरे सिंड्रोम हा एक पोस्ट-व्हायरल व पोस्ट-बॅक्टेरियल आजार आहे.
- हा आजार १९१६ पासून आढळत आहे आणि तो भारतातच नव्हे तर जगभरातील विविध देशांमध्ये सापडतो.
- हा आजार दुर्मिळ असला तरी जीवघेणा नाही. मात्र, स्नायूंमध्ये वेदना, गुडघे दुखणे ही त्याची प्राथमिक लक्षणे आहेत.
- दूषित पाणी हे या आजाराचे एक मुख्य कारण असू शकते.
डॉक्टरांचा सल्ला:
- उकळलेले किंवा स्वच्छ पाणीच प्यावे.
- रस्त्यावरील व उघड्या ठिकाणी मिळणारे अन्न टाळावे.
सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टरांनी नागरिकांना या सूचना दिल्या आहेत.












