नारायणगाव: पुणे-नाशिक रोडवरील वारूळवाडी गावाच्या सीमेवर अँबुलन्सचे सायरन वाजवल्यामुळे अँबुलन्स चालकाला गंभीर मारहाण करणाऱ्या दोन व्यक्तींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अँबुलन्स चालक सोमनाथ भास्कर गायधने (वय ३२, कडाचीवाडी चाकण, खेड राजगुरुनगर जिल्हा, पुणे) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
धनेश तळपे (पूर्ण नाव पत्ता ज्ञात नाही) आणि आणखी एक इसम (नाव पत्ता ज्ञात नाही) यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी (७ तारीख) सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता पुणे-नाशिक महामार्गावर वरील वारूळवाडीमध्ये माऊली मिसळ हाऊससमोर, अॅम्ब्युलन्सचे सायरन वाजविल्याच्या कारणावरून पल्सर मोटार सायकलवरील दोन जणांनी संगणमत करून अॅम्ब्युलन्स गाडीला आडवे आले. तू सायरन का वाजवतो, असे म्हणून सोमनाथला अँबुलन्समधून बाहेर खेचून काढले आणि हाताने व लाथांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली.
यावेळी, धनेश तळपेने हातात चावी धरून सोमनाथच्या उजव्या डोळ्यावर वार केला. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत दुसरा इसम स्वतःला पत्रकार असल्याचे सांगत आहे. नारायणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.












