निघोज: कुकडी डावा कालव्याला ११ डिसेंबरपर्यंत पाणी सोडणार असल्याची माहिती आमदार काशिनाथ दाते यांनी दिली आहे. पारनेर तालुक्यातील कुकडी डावा कालवा परिसरातील गावांमध्ये पाण्याची तुटवड्याची समस्या जाणवू लागली आहे. यासाठी येत्या ११ डिसेंबरपर्यंत कुकडी डावा कालव्याला पाणी सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नामदार दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, सहकारी बँकेचे प्रशांत गायकवाड, विश्वनाथ चौधरी आदींचा समावेश होता. यावेळी वळसे पाटील यांचा आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पारनेर तालुक्यातील बहुसंख्य गावांमध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच गोधन संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने दूध उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी यांनी कुकडी डावा कालव्याला पाणी सोडण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांच्याकडे मागणी केली होती. आमदार दाते यांनी गुरुवारी वळसे पाटील यांची भेट घेऊन तातडीने पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. कुकडी डावा कालवा पट्यातील शेतकऱ्यांनी आमदार दाते यांचे आभार मानले आहेत.
कुकडी डावा कालवा पट्यात तालुक्यातील वीस ते पंचवीस गावांचा समावेश असून जवळपास हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येते. साधारण डिसेंबर ते मे महिन्यात या भागात पाण्याची तुटवड्याची समस्या निर्माण होते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव भागात धरणे असल्याने पाणी हे पुणे जिल्ह्यातून नगर जिल्ह्यात येते. पारनेरचे आमदार काशिनाथ दाते आणि आंबेगावचे आमदार व ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा समन्वय चांगला आहे. सहकार्य करणारे वळसे पाटील हे आमदार दाते यांचे मार्गदर्शक मित्र आहेत. त्यामुळे पाच वर्षे या समन्वयामुळे पारनेर सारख्या दुष्काळी तालुक्यातील जनतेला पाणी कमी पडणार नाही असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे.
फोटो ओळी: पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन पाण्याची मागणी केली व त्यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, जिल्हा परिषद माजी सदस्य व भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव चेडे, विश्वनाथ चौधरी आदी उपस्थित होते.















