थेऊर उभ्या ट्रकखाली दुचाकी घुसली; अपघातानंतर नागरिकांची तत्पर मदत
लोनी काळभोर: थेऊर फाटा येथे थेऊरगावाकडे जाणाऱ्या रेल्वे फ्लायओव्हरजवळ उभ्या असलेल्या ट्रकला एका दुचाकी चालकाने मागून धडक दिली. या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी लोनी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी (19 तारखेला) सायंकाळी साडेसात वाजता घडली. अपघातात जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती गंभीर आहे.
हे देखील वाचा: नवीन वर्षात 3500 नवीन लालपरी बसेसचा समावेश होणार: भरत गोगवले
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक थेऊर फाटा येथे थेऊर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे पुलाजवळ उभा होता. या वेळी, दुचाकी चालक पुणे-सोलापूर महामार्गावरून थेऊरकडे जात होता. त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो थेट उभ्या ट्रकच्या मागील भागावर धडकला.
या दरम्यान दुचाकी चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्त्राव सुरू झाला. तसेच दुचाकी ट्रकखाली अडकली. या वेळी उरुळी कांचन वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी राजेश पवार, वार्डन सुशांत वरळीकर आणि नागरिकांच्या मदतीने त्या व्यक्तीला अॅम्ब्युलन्सद्वारे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. लोनी काळभोर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, पुढील तपास सुरू आहे.











